राजकारणात नैतिकतेच्या गोष्टी नेहमीच विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून का केल्या जातात? सत्तेच्या शिखरावर पोहोचल्यानंतर मात्र या नैतिकतेला राजकिय पक्ष का विसरत असावेत ? हे प्रश्न अत्यंत सोपे वाटत असले तरी आजपर्यंत याची उत्तरे देशाला मिळालेली नाहीत . अरुणाचल प्रदेश नंतर मणिपूर आणि आता उत्तराखंड राज्यातील सत्ता हस्तगत करण्यासाठी जो घोडेबाजार चाललाय तो हैराण करणारा असला तरी भारतीय राजकारणासाठी नवीन मात्र नक्कीच नाही ..
सत्ताधारी पक्षातील काही सदस्यांचे पक्षांतर करून सत्ताधारी पक्षाला पदच्युत करणे हे भारतीय राजकारणासाठी नवीन नाही ..उत्तराखंड मधील हरिश रावत यांना त्यांच्या पक्षातील विधानसभा सदस्यांना सांभाळता येत नाही. महत्वाचे म्हणजे सत्ता खेचण्याचा खेळ तो पक्ष खेळतो आहे जो आगोदर काँग्रेस वर लोकशाहीचा गळा घोटणारा पक्ष म्हणून आरोप करताना कधीही थकत नव्हता .
देशाच्या इतिहासात अधिकांश राज्यात काँग्रेसचीच सरकारे जास्त वेळा सत्तेवर आली आहेत . चुकुन काँग्रेस कुठे विरोधी पक्षात असेल तर तिथं सत्ताधारी पक्ष नेहमीच काँग्रेस च्या निशान्यावर असायचा . काँग्रेस ने आंध्र प्रदेशात एन टी रामाराव आणि हारीयाणातील चौधरी देविलाल यांच्या सरकारांना पदच्युत करण्यात आले होते. त्यावेळी भाजपाने काँग्रेस चा विरोध करताना कोणतीही कसर सोडलेली नव्हती . (सोडने योग्य ही नव्हते ...)
उत्तराखंड मधील जनतेने काँग्रेस ला पाच वर्षासाठी सत्ता सोपवली होती त्यापैकी जवळपास चार वर्ष पुर्ण झाली आहेत आता पुढच्या विधानसभा निवडणुका फक्त एका वर्षाच्या अंतरावर येवुन ठेवल्या आहेत . अशा परिस्थितीत भाजपाला हे वर्ष निवडणुकांच्या तयारीत घालवायला हवे का सत्तेचा घोडेबाजार करण्यात ? बिहार मध्ये ही जितन राम मांझी ना मोहरा बनवुन भाजपाने खेळ करण्याचा प्रयत्न केला होता . त्याचे परिणाम आपल्या सर्वांपुढे आहेतच . भाजापाने दिल्लीत जी चुक केली ती बिहार मध्ये दुरूस्त केली नाही आणि बिहार ची च पुनरावृत्ती आता उत्तराखंड मध्ये होताना दिसत आहे .
राजकीय पक्ष राजकारणात सत्ता मिळवण्यासाठीच असतात हे मान्य आहे , यात कोणती चुक ही नाही . परंतु त्यासाठी सत्तेत येण्याचा मार्ग योग्य असावा . मागच्या दाराने सत्ता मिळवता येईल ही परंतु जनतेच्या नजरेत तुमचे स्थान उंचावणार नाही . असो शेवटी जेंव्हा जेंव्हा कुणी असा प्रकार केलाय तेंव्हा तेंव्हा जनतेने त्यांला योग्य प्रत्युत्तर दिलेले आहे..
~▪■ संदीप नागरगोजे, गंगाखेड ■▪~
Comments
Post a Comment