आज गुरुपौर्णिमा... गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्या शेकडो पोस्टांनी फेसबुक भरून गेलेले आहे . माझ्याही आयुष्यात मला घडवणारे अनेक गुरूजन लाभले , आई - वडिल - मोठा भाऊ यांच्या शिवाय गावात प्राथमिक शाळेत श्री तेलंग सरांचा माझ्यावर विशेष प्रभाव , शाळेत बसत नाही म्हणून शिक्षा करणाऱ्या तेलंग सरांना चिमटे घेऊन पळून जाणारा मी भितीने परत शाळेत जायचे नाव घेत नव्हतो तेंव्हा घरी येऊन दोन रुपये हातावर ठेऊन शाळेत घेऊन जाणारे तेलंग सर आजही आठवतात आणि आजही माझ्या कोणत्याही कामात मी त्यांचा सल्ला घेतो , दुसरे जोशी सर.. जोशी सरांची शिकवण्याची पध्दत अतिशय सुरेख, तेलंग सरांची बदली झाल्यानंतर आमच्या गावच्या शाळेची झालेली अवकळा त्यांनीच सुधारली..पुढे पाचवी झाल्या नंतर गावात पुढची इयत्ता नसल्याने इयत्ता सहावी साठी गावापासून तीन - साडेतीन किमी अंतरावर असलेल्या मरगळवाडी च्या शाळेत प्रवेश घेतला.. तिथले कदम सर आणि वाडीवाले सर हे माझे आवडते.. आठवी पासून बारावी पर्यंत विशेष नाव घ्यावं असं कोणी वाटलंच नाही.. तरी गंगाखेड च्या संत जनाबाई शाळेतील नागरगोजे सर आणि मुंडे सर विसरता येणार नाहीत.
नंदुरबार जिल्ह्य़ातील महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमेवर असलेल्या नवापूर येथील मार्च अध्यापक विद्यालयात डि.एड साठी नंबर लागला होता तिथून डायरेक्ट गंगाखेड ला Mitual Transfer मिळाल्याने तिथे जास्त दिवस राहता आले नाही परंतु तिथे गावीत सरांनी केलेले सहकार्य नेहमीच स्मरणात आहे .
नवापूर वरून बदली करून पुढे डि.एड साठी गंगाखेड ला आलो आणि इथे असे काही महाभाग प्राध्यापक भेटले की मी पुरता गोंधळून गेलो होतो . उठसूट कोणत्याही गोष्टीचा काहीही संबंध नसताना काहीच्या काही निष्कर्ष काढणारे आणि विद्यार्थ्याच्या विरोधात (माझ्या विरोधात) उगाचच काहीही उचापती करणारे शिक्षक मी पहिल्यांदाच पाहत होतो माझ्या विरोधात सुरू असलेले उद्योग ढळढळीत समोर दिसत असताना मी मात्र "गुरू परमात्मा" मानणारा असल्याने सर्व काही सहन करत होतो . पुढे एका अध्यात्मिक महाराजांच्या भेटीत या विषयावर चर्चा झाल्यानंतर अशांना गुरू मानूच नये हे शब्द ऐकल्यावर माझ्यात झालेला बदल सुरूवातीला कोणाच्याही पचनी पडत नव्हता . ( इथल्या शिक्षकांच्या "त्या" कुरापती कोणत्या आणि कशासाठी होत्या हे इथे सांगने उचित होणार नाही..) पुढे दोनवर्ष हा संदीप नागरगोजे त्यांच्या स्वप्नात सुद्धा त्रास देत होता हे सेंड ऑफ च्या कार्यक्रमात त्यांनीच कबुल केलेले वास्तव आहे . अर्थातच तिथे ही काही अपवाद असलेले कांबळे सरांसारखे चांगले आणि प्रामाणिक शिक्षक होतेच.. "शिक्षक/गुरू कसा नसावा" हे इथे समजले.
डिएडला असताना इंग्रजी विषयाचे क्लास करावेत म्हणून आमचे लहानपणापासून घरगुती संबंध असलेल्या बाळु भाऊ ( मुंढे सर ) कडे लावले होते तिथं आपला बाळु भाऊ शिक्षक म्हणून कसा आदर्श व्यक्तीमत्व आहे हे समजले . पुढे काही दिवस स्पर्धा परीक्षांचे क्लासेस करण्यासाठी लातूर च्या सोहम आणि फिनिक्स क्लासेस ला होतो तिथे भेटलेले डाॅ.बाबुराव बिक्कड सर हे मला आजही खुपच आदर्श वाटतात , ते सध्या परळी वैजनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आहेत.
थोडक्यात हे शैक्षणिक क्षेत्रातील गुरूंचे सिंहावलोकन म्हणता येईल . पण या क्षेत्रा व्यतिरिक्त बाकी क्षेत्रातील अनेक लोक भेटले ज्यांना माझ्या मनाने मनोमन गुरुस्थानी मानले आहे. त्यापैकी काही मोजकी नावे घ्यायलाच हवीत.
माझ्या फेसबुकच्या मित्र यादीत विवीध क्षेत्रातील नामांकित मंडळी आहेत त्यापैकी डाॅक्टर नितीन चाटे सर यांच्या विषयी प्रचंड आदर आहे . अंबाजोगाई च्या वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्जरी विभागाचे प्रमुख प्रसिद्ध सर्जन डाॅ.नितीन चाटे यांचा त्यांनी राबवलेल्या विक्रमी आरोग्य शिबिराच्या कार्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री सुरेश प्रभु आणि ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी नुकताच त्यांचा सत्कार केला आहे.
मला राजकारणातले काहीही कळत नाही तरी या क्षेत्रातील अनेक लोकांशी चांगले संबंध आहेत त्या सर्वांची नावे इथे लिहीता येणार नाहीत . राजकिय क्षेत्रातील गंगाखेड तालुक्यातील मातब्बर नाव असलेले भगवान भाऊ सानप हे नेहमीच मला लहाण भावा प्रमाणे मार्गदर्शन करतात . पत्रकारिता क्षेत्राची विलक्षण आवड आहे , या पैकी दैनिक एकमत चे संपादक सुशील कुलकर्णी यांचे लेख आवर्जून वाचतो , एबीपी माझा चे विलास बडे यांची बातम्या सांगण्याची पध्दत आणि लिखान दोन्ही परफेक्ट असतं.. बाकी फेसबुक आणि आध्यात्मिक क्षेत्रात असे भरपूर लोक आहेत ज्यांना गुरू मानता येईल .अनेक मित्रही असे आहेत जे या यादीत बसतील. त्यामुळे सर्वांचे नाव घेणे शक्य नाही त्याबद्दल क्षमस्व.. हे लिहीताना आठवून - साठवून लिहीत नसल्याने अनेकांचा उल्लेख यात झाला नसेल..
अशा ज्ञात अज्ञात सर्व गुरूजनांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..
: संदीप नागरगोजे, गंगाखेड
Comments
Post a Comment