दसरा जवळ आला की महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात दसरा मेळाव्याची चर्चा रंगायला सुरूवात होते. कारण महाराष्ट्रात दसरा मेळाव्याना एक वेगळे आणि महत्वाचे स्थान आहे. महाराष्ट्रात दसरा मेळाव्याच्या परंपरांमध्ये तीन दसरा मेळावे प्रसिद्ध आहेत , त्यापैकी शिवसेनेचा शिवतीर्थावरील दसरा मेळावा , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नागपूर मध्ये होणारा दसरा मेळावा आणि ऊसतोड कामगारांचा भगवानगड दसरा मेळावा. ऊसतोड कामगारांचा दसरा मेळावा भगवान गडाच्या ऐवजी गेल्यावर्षीपासून भगवान बाबांचे जन्मस्थान असलेल्या सावरगाव येथे होत आहे आणि आज घडीला हा दसरा मेळावा महाराष्ट्रात सर्वात जास्त चर्चिला जाणारा दसरा मेळावा ठरतोय.
दसरा मेळावा आणि वाद हे तसं जुनेच समीकरण आहे. सुरुवातीला शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर आक्षेप घेतले जायचे यामागे अनेक कारणे सांगितली जायची, कधी आवाजाची मर्यादा , कधी राजकीय वक्तव्य तर कधी आणखी काही निराळेच. संघाच्या दसरा मेळाव्यावर सुद्धा अनेक लोक बोट ठेवतात. राष्ट्रीय मीडियात त्याची चर्चा सुद्धा खूप होते. मात्र आज घडीला गेल्या काही वर्षांपासून सर्वात जास्त चर्चिला जाणारा दसरा मेळावा आहे तो म्हणजे भगवानगड अर्थातच आताचा सावरगाव घाट येथे होणारा दसरा मेळावा.
लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे हयात असताना हा दसरा मेळावा कधीच वादाचा विषय नव्हता. संघाच्या नागपूरच्या आणि शिवसेनेच्या मुंबईतील दसरा मेळाव्यांना होणाऱ्या गर्दी पेक्षा भगवानगडावर जास्त लोक स्वयंस्फुर्तीने जमायला लागली होती , ही परंपरा सावरगाव येथे पण चालू आहे . गेल्यावर्षी पंकजाताईच्या एका हाकेवर अतिशय कमी कालावधी मध्ये लाखो लोकांचा जनसमुदाय भगवान बाबांचे जन्मस्थान असलेल्या सावरगाव मध्ये जमला होता. मात्र गेली कित्येक वर्षांपासून लाखो भक्तांच्या मांदियाळी मध्ये भरून जाणाऱ्या भगवानगडावार शुकशुकाट पाहायला मिळाला.
भगवानगडावरील दसरा मेळावा हा ऊसतोड कामगारांच्या एकतेची वज्रमुठ समजला जायचा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कष्टकरी , ऊसतोड मजूर या दसरा मेळाव्याला बाबांच्या चरणावर मस्तक ठेवण्यासाठी आणि स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांना ऐकण्यासाठी स्वयंस्फूर्तीने उपस्थिती लावायचे. मुंडे साहेबांच्या नंतर या लोकांनी पंकजाताई ला आपलं नेतृत्व मानले आणि भगवानगडानेही गडाची कन्या. साहेबांच्या जाण्याच्यानंतर 2014 च्या दसरा मेळाव्याला पंकजाताईंनी भगवानगडावरून संबोधित केले. तो दसरा मेळावा पूर्वीच्या दसरा मेळाव्यापेक्षाही जास्त भव्य आणि परिणामकारक ठरला होता आणि बहुधा त्यामुळेच दसरा मेळावा बंद पाडण्याचे कटकारस्थान रचायला सुरुवात झाली.
भगवानगड दसरा मेळाव्यासंदर्भात वाद का घडवून आणला गेला ? यामागील 'खऱ्या' कारणांचा शोध घेणे महत्वाचे आहे. महाराष्ट्रात स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांच्या पश्चात ऊसतोड कामगारांची वज्रमुठ ढिल्ली करुन पंचवीस तीस पेक्षा अधिक विधानसभा मतदारसंघांवर झटका देण्याचे षडयंत्र रचलं गेलं का ? कारण नुकत्याच एका पक्षाच्या राष्ट्रीय नेत्याने बंद दाराआड ऊसतोड कामगारांच्या संघटना बंद करण्याचे आदेश दिलेली व्हिडिओ क्लिप वायरल झाल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. गडाच्या महंतांची भूमिका सुद्धा 'त्याच' लोकांना अनुकूल असलेली वादग्रस्त आणि संशयास्पद आहे. मुंडे साहेबांच्या अपघाती निधनानंतर दुसऱ्याच दिवशी भगवानगडावरील दसरा मेळाव्याला मुंडे साहेब संबोधित करायचे ते स्टेज पाडले गेले. स्टेज बरोवरच गडावर साहेबांच्या नावाच्या कोणशीला असलेल्या बाकी वास्तू देखील पाडल्या गेल्या यामागे नक्कीच कोणता उदात्त हेतू नव्हता.
राजकारणाची ऍलर्जी असल्याचे वरवर दाखवणाऱ्या महंतांचे नाव ज्यांची उभी हयात गडाच्या विरोधात बोलण्यात आणि तिरस्कार करण्यात गेली आशा नेत्यांसोबत पत्रिकांवर छापले जाणे , सोशल मिडिया मध्ये यावर सडकून टीका झाल्यानंतर महंताच्या ऐवजी गडाच्या सचिवाने त्या कार्यक्रमास उपस्थिती लावणे. हा सर्व काही योगायोग नाही .. राजकारण विरहित भगवानगड पाहिजे तर मग राजकीय महत्वाकांक्षा असलेला सचिव महंताला चालतोच कसा ? अनेक वर्षाची परंपरा असलेल्या दसरा मेळाव्याला परवानगी नाकारणारे प्रशासन सुद्धा या कटामध्ये आप्तस्वकीय आणि विरोधक सर्व मिळालेले आहेत याची साक्ष देत नाही का ?
दसरा मेळाव्यात भगवानबाबांचे दर्शन घेऊन आणि गोपीनाथ मुंडेंचं भाषण ऐकुन ऊसतोड कामगार आपल्या मजुरीला निघणार हा तीन दशकांचा दंडक मोडुन काढण्यासाठी वाद पेटवला गेला का ? राज्यातील सर्वच राजकीय पक्षाचे नेते या मेळाव्यात उपस्थिती लावून गेले आहेत दसरा मेळावा हा बिगरराजकीय होता याचा यापेक्षा मोठा पुरावा आणखी काय असू शकतो ?
दसरा मेळाव्याच्या वादामुळे बारा ते पंधरा लाख संख्या असलेल्या ऊसतोडकामगारांचे सुसंघटीत नेतृत्व अडचणीत येईल असा विरोधकांचा अंदाज चुकला आणि फक्त चार एकर परिसरात भगवानगडावर भरणारा मेळावा आता पाच पट अधिक जागेत तितकेच पट अधिक जनसमुहाच्या साक्षीने गेल्या वर्षी पार पडला आहे . यावर्षी आणखी मोठे स्वरूप या मेळाव्यास प्राप्त होईल. आणि याला छेद देण्यासाठी भगवानगडावर पंकजाताई मुंडेंच्या विरोधकांना आमंत्रित करुन दसरा साजरा केला जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
ऊसतोडकामगारांचा लाखोंचा समुदाय व त्यासोबत लोप पावलेले राजकीय महत्व ही महंत नामदेव शास्त्रींच्या फाडुन खाण्याच्या रावणछाप वागण्याबोलण्याचे फलित आहे. अहंकारी वृत्तीला षडयंत्रकारी सल्लागारांच्या कह्यात जाऊन आज अस्तित्वशुन्य होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
राजकीय भाषणबंदींच्या थापा मारुन स्वत: राजकीय पोळी भाजु पाहणाऱ्या महंतावर समस्त भगवानभक्त नजर ठेऊन आहेत. भगवानगडाच्या लेकीला अडचणीत आणु पाहणाऱ्या प्रवृत्तींचा बंदोबस्त करायला आजही लाखो मुंडेसैनिक सज्ज आहेत याचा विसर महंत , राजकीय सचिव आणि अतिराजकीय अर्धवट सल्लागारांनी पडु देऊ नये.
- संदीप नागरगोजे , गंगाखेड
Comments
Post a Comment