लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब या नावाशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास कधीच पुर्ण होवू शकत नाही . देशाच्या इतिहासात सामान्यांतून येवून स्वकर्तुत्वाने असामान्य ' दिग्विजय ' करणार्या काही मोजक्या लोकांपैकी एक असणारे साहेब आज आपल्यात नाहीत हे महाराष्ट्राचं फार मोठं दुर्दैव म्हणावे लागेल. त्यांची उणीव आज महाराष्ट्रातील जनतेला सातत्याने जाणवतेय . गेल्या काही दशकांपासून साहेबांच्या कार्यावर खुप काही लिहीले गेले आहे , पुढेही लिहील्या जाईल परंतु मुंडे साहेबांचे कर्तुत्व शब्दांत कधीच कुणाला मोजता येणार नाही .
महाराष्ट्रातील ओबीसी, दलित, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर आणि अल्पसंख्यांकांना ही आकर्षित करण्यामागे त्यांचे जादुई नेतृत्व कारणीभूत होते . विद्यार्थी दशेपासूनच मुंडे साहेब सामाजिक चळवळीशी जोडल्या गेले होते.
महाराष्ट्रातील पुरोगामी आणि डाव्या विचारवंतांनी सामाजिक न्यायाचा आणि हिंदुत्वाचा काहीही संबध नसतो असा एक अपसमज योजनाबद्ध पध्दतीने पसरवलेला आहे . मुंडे साहेबांनी या विचारधारेला राजकीय क्षेत्रात जबरदस्त हादरे दिले . हिंदुत्व आणि सामाजिक न्याय , राष्ट्रवाद आणि सामाजिक न्याय या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे दाखवून दिले. सामाजिक न्यायाच्या , समतेच्या विषयावर त्यांनी पुस्तके लिहून किंवा भाषण बाजी करून बढाया मारण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करण्याला महत्त्व दिले .
नामातंराचा लढा , मंडल आयोगाची अंमलबजावणी , भटक्या विमुक्तांसाठी स्वतंत्र मंत्रालयाल , शेषनगर पारध्यांच्या वस्तीवरील हल्ला वा गोवारी हत्याकांड , शेतकरी संघर्ष अभियान , गोदा परिक्रमा , जळगाव वासनाकांड निषेध आंदोलन , भूकंपग्रस्त पुनर्वसन चळवळ , अक्कलकोट ते कल्याण संघर्ष यात्रा, दुष्काळी परिषदा , जायकवाडी पाणी प्रश्न अशा अनेक आंदोलनं-चळवळींच्या माध्यमातून त्यांनी जनतेचे प्रश्न ऐकून घेवून सरकार दरबारी ते सोडवण्यासाठी सर्वस्व पणाला लावले . ओबीसींच्या जातवार जनगणनेसाठी त्यांनी लोकसभेत ऐतिहासिक भाषण केले आणि ओबीसींची जातवार जनगणना करण्याची मागणी केली या मागणीला देशातील अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा देत साहेबांना देशातील संपूर्ण ओबीसी समाजाचे नेते मान्य केले . अगदी अलिकडचे उदाहरण द्यायचे झाले तर २०१४ च्या लोकसभेच्या निकालानंतर बाकिचे नेते मंत्रीपदासाठी सेटिंग लावण्यात व्यस्त असताना मुंडे साहेब मात्र नगरच्या नितीन आगे हत्येप्रकरणी त्याच्या आई - वडिलांना धीर देत होते . त्यांचे सांत्वन करून त्यांना न्याय मिळवून देण्याची हमी देत होते यावरून त्यांचे खुर्ची पेक्षा लोकांना जास्त प्राधान्य होते हे समजून येते .
विरोधी पक्ष नेता कसा असावा याचे आदर्श उदाहरण साहेबांनी दाखवून दिले . वास्तविक पाहता राजकिय लाभाचा विचार करताना सामाजिक समस्यांवर आवाज उठवणे हे महागाई, भ्रष्टाचार , दरवाढ अशा प्रश्नावर आवाज उठवण्या सारखे सोपे नसते . सामाजिक प्रश्नावर आवाज उठवताना, एखादी बाजू घेताना एक मोठा सामाजिक वर्ग दुखावला जाण्याची शक्यता असते .म्हणूनच 'शहाणे' नेतेमंडळी अशा प्रसंगी तटस्थ भुमिका घेवून गप्प पडून राहतात . परंतु मुंडे साहेब या श्रेणीत कधीच बसले नाहीत त्यांनी नामातंर चळवळीत घेतलेली भुमिका आणि दिलेले योगदान याचं रोखठोक उदाहरण आहे .
सर्वसामान्य मुंबईकर अंडरवर्ल्ड च्या दहशतीने त्रस्त झाले होते , राजकीय पक्ष आणि नेते ही अंडरवर्ल्ड च्या भितीने शेपूट घालून शांत बसले असताना मुंडे साहेबांनी या प्रश्नावर रान उठवलं " शिवनेरी ते शिवतीर्थ " 'संघर्ष यात्रा' काढून भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळवून दिली . विरोध पक्षात असताना "सत्ता द्या ... गुन्हेगारी संपवतो " हे दिलेले अश्वासन त्यांनी सत्तेत आल्यानंतर पुर्ण केले .
दाऊद गॅन्गच्या थेट धमक्यांना व गवळी गॅन्गचा बचाव करु पाहणारया सहकारी पक्षांना त्यांनी जुमानलं नाही.
पाचशे गुंडांना ढगात पाठवणारया लढवय्या पोलिस अधिकारयांमागे मुंडेसाहेब हिमालयासारखं ऊभे राहीले. पुर्वी नेत्यांपुढे हतबल झालेल्या पोलिसांना अधिकार देवून आत्मविश्वास आणि स्वाभिमानाने जगायला शिकवलं ..
साहेबांच्या पश्चात ही त्यांच्यावरील जनतेच प्रेम कमी होत नाही उलट ते कित्येक पटीने वाढत चाललंय . साहेबांना आज त्या जनतेने देव्हार्यात बसवलंय , कोणत्याही मंगलकार्यात त्यांच्या फोटोची पुजा केली जात आहे , मुस्लिम समाजाच्या लग्नाच्या पत्रिकेवर सुध्दा साहेबांचे फोटो छापले जात आहेत . सर्वसामान्यांनी स्वखर्चाने साहेबांचे शेकडो पुतळे आणि समाधी उभारल्या आहेत , सर्वात महत्वाचे म्हणजे आज पर्यंत कोणत्याही नेत्याचे झाले नसेल असे भव्य आणि दिव्य " गोपीनाथगड " हे साहेबांचे समाधीस्थळ जनतेच्या पैशातून उभारले गेलेय .
जनतेनेकडून साहेबांना जे प्रेम मिळाले ते क्वचितच कुणाच्या वाट्याला आले असेल . कोणत्याही संकटाला निधड्या छातीने सामोरे जाण्याची आणि त्या संकटावर मात करण्याची ताकद साहेबांना हेच जनतेचं प्रेम देत होतं . साहेबांना जावून दोन वर्षे पूर्ण होत आहेत तरीही साहेबांचे स्थान जनसामान्यांच्या मनातलं काहीही कमी झालेलं नाही . उलट ते कित्येक पटीने अधिक होत आहे आणि पुढची शेकडो वर्षे ते असंच वाढत जाणार आहे ..
Comments
Post a Comment